चैतन्‍याच्‍या ज्ञानसागरातील भ्रमंती. . .


समाजाच्‍या अनेकानेक उत्‍तमोत्‍तम उपक्रमांमध्‍ये वेळोवेळी जाण्‍याचा योग येतो आणि अधिकाधिक उर्जा मिळते. संघ प्रचारकीय जीवनाचा प्रारंभ अकोल्‍यापासून झाल्‍यामुळे अकोल्‍याशी ऋणानुबंध अधिक आहे. त्‍यातही परमश्रध्‍देय स्‍व. काकाजी खंडेलवाल हे तेव्‍हा अकोल्‍याचे संघचालक असल्‍यामुळे अगदी जवळुन त्‍यांच्‍या सोबत काम करण्‍याचा योग आला. त्‍यांनी निर्माण केलेल्‍या अकोल्‍यातील अनेक संस्‍थांच्‍या जडणघडणीला जवळुन अनुभवता आलं.

स्‍व. काकाजींनी आपल्‍या परिश्रमाने उभारलेल्‍या अकोल्‍याच्‍या जुन्‍या शहरातील शिक्षणसंस्‍थेत तसं नेहमीच जाणं-येणं होतं. पण प्रत्‍येकवेळेची भेट ही नित्‍यनवी असते. काकाजींच्‍या सात्विकतेचे आणि अबोल साधनेचे प्रत्‍येक वेळेस जणू दर्शनच होते.

दिनांक ०१ ऑगस्‍ट हा स्‍व. काकाजींचा जन्‍मदिवस. काकाजींच्‍या देहावसानानंतर त्‍यांच्‍या नावाने उभारलेल्‍या शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात दरवर्षी हा दिवस प्रेरणा दिन म्‍हणुन साजरा केल्‍या जातो. या अनुपम सोहळयात अनेकदा गेलो आहे. पण दरवेळेसची चैतन्‍याची अनुभूती ही वेगवेगळया भावविश्‍वाचे प्रगटीकरण करणारी असते.

काल दिनांक ०१ ऑगस्‍ट २०२३ ला या प्रेरणा सोहळयातील उपस्थिती म्‍हणजे चैतन्‍याच्‍या ज्ञानसागरातील भ्रमंतीच होती. महाविद्यालयाच्‍या प्रशस्‍त आणि भव्‍य अशा पद्मानंद सभागृहात हा देखणा सोहळा संपन्‍न झाला. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसादजी वाडेगांवकर यांच्‍या सारख्‍या शिक्षण तपस्‍वीची विशेष उपस्थिती समारोहाची उंची वाढविणारी होती.

प्रारंभी महाविद्यालयात नवनिर्मित एम.एस्‍सी. संगणक प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्‍यात आले. “परम संगणक कक्ष” असे नामकरण असलेली ही आवश्‍यक सुविधायुक्‍त आणि सुंदर अशी प्रयोगशाळा विद्यार्थ्‍यांना संगणकाचे ज्ञानसंवर्धन करण्‍यास संस्‍थेने सुसज्जित केली आहे. या कक्षाचे दिपप्रज्‍ज्‍वलन आणि श्रीसरस्‍वती पूजन करून विधिवत् उद्घाटन झाले.

यानंतर पद्मानंद सभागृहाच्‍या भव्‍य स्क्रिन वर काकाजींच्‍या जीवनकार्यावर पंधरा मिनिटांचा लघुपट दाखविण्‍यात आला. अत्‍यंत हदयस्‍पर्शी आणि काकाजींचे चरित्र डोळयांपुढे उभा करणारा हा लघुपट मान्‍यवर अतिथी, निमंत्रीत आणि विद्यार्थ्‍यांनी अत्‍यंत तन्‍मयतेने अक्षरश: अनुभवला.

यानंतर मुख्‍य समारोह “जन मन जागर करीत, निरंतर विद्यापीठ चाले, संत गाडगेबाबा तुमचे स्‍वप्‍न पूर्ण झाले ” या गीताने प्रारंभ झाला. लोकमान्‍य टिळक, लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे आणि स्‍व. काकाजींच्‍या प्रतिमांचे पूजन आणि इतर आवश्‍यक सोपस्‍कार पूर्ण झाल्‍यावर पुरस्‍कार वितरण झाले. प्राविण्‍य प्राप्‍त विद्यार्थी आणि विशेष कामगिरी केलेल्‍या शिक्षक व कर्मचा-यांना यावेळी पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आले. पुरस्‍कार प्राप्‍त विद्यार्थ्‍यांपैकी काहींचे मनोगत अत्‍यंत बोलके होते. कु. मनिषा निकस हीने गायिलेल्‍या “जीस दिन सोया-राष्‍ट्र जगेगा, दिस दिस फैला तमस हटेगा ” या वैय्यक्तिक गीताने तर प्रेरणा सोहळयाला भावविभोर केले. यानंतर मा. डॉ. प्रसाद वाडेगांवकरजी यांचे उद्बोधन म्‍हणजे शिक्षणक्षेत्रातील त्‍यांच्‍या अनुभवांचे आणि कार्याचे जणू संचितच. विद्यार्थ्‍यांकरीता अत्‍यंत मौलीक असे होते.

समारंभाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी असल्‍याचा लाभ घेत स्‍व. काकाजींच्‍या जीवनातील प्रेरणादायी प्रसंगांना विद्यार्थ्‍यासमोर मांडले. स्‍व. काकाजींचे जीवन म्‍हणजे समाजजीवनाच्‍या असंख्‍य कार्यांचा सागरच जणू. यातील काही बिंदूंना उपस्थितांसमोर अभिव्‍यक्‍त करता आले याचा मनस्‍वी आनंद झाला. संस्‍थेच्‍या अध्‍यक्षा डॉ. ताराताई हातवळणे, सचिव श्री गोपालभैय्या खंडेलवाल, सदस्‍य गिरीषजी देशपांडे, सौ. रेखाताई, श्री मधूरजी, प्राचार्य डॉ. साबू आणि महाविद्यालयातील सर्वच शिक्षक व कर्मचा-यांची स्‍नेहील भेट आनंददायी होती.

स्‍व. काकाजी म्‍हणजे संघसाधक जीवन. काकाजींसोबत संघकाम करता आलं हे आमचं भाग्‍य. त्‍यांनी लावलेला जिव्‍हाळा अन त्‍यातुन निर्माण झालेली श्रध्‍दा परत परत या ज्ञानसागराकडे ओढीत असते...आणि प्रत्‍येक वेळेस नवचैतन्‍याचे बिजारोपण करीत असते. काकाजींच्‍या प्रेरणेतुन निर्माण झालेल्‍या या चैतन्‍याच्‍या ज्ञानसागरातील एक ऑगस्‍टची ही यात्रा प्रेरणेचे अनंत दिपप्रज्‍ज्‍वलीत करणारी अशीच होती.

प्रा. रविंद्र भुसारी,
महाल कार्यालय,
नागपूर.
भ्रमणध्‍वनी: (९५९४७५३४४४)